मुंबई : धडपड करून विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या भाजप सरकारने उच्च न्यायालयातही विजयी पताका कायम ठेवली आहे़ या आवाजी मतदानाविरोधातील दोन्ही याचिका न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावल्या़ त्यामुळे भाजप सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला ़भाजपच्या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानाला काँग्रेसचे आमदार नसीम खान व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार अवस्थी यांनी स्वतंत्र याचिका दाखल करून न्यायालयात आव्हान दिले होते़ न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर याची सोमवारपासून सलग चार दिवस सुनावणी सुरू होती़ त्यात याचिकाकर्त्यांकडून अॅड़ अनिल अंतुरकर यांनी युक्तिवाद केला़ ते म्हणाले, आवाजी मतदान हे बेकायदा आहे़ याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे व मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी फौजफाटा होता़ विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी नियमानुसारच आवाजी मतदानाला परवानगी दिली होती़ त्यात बहुमत सिद्ध झाले़ त्यामुळे वैयक्तिक मतदानाचा प्रश्नच उद्भवत नाही़ आणि याचिकाकर्ते हे भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा करून असून ते गैर असल्याचा युक्तिवाद अॅडव्होकेट जनरल मनोहर यांनी केला़ याचे अॅड़ अणे यांनी समर्थन केले़ अखेर विधानसभेतील मतदानासंदर्भात हस्तक्षेप करण्याचे अधिकार न्यायालयाला नसल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने या याचिका फेटाळल्या़ (प्रतिनिधी)
हायकोर्टातही भाजपाचा विजय
By admin | Updated: December 5, 2014 03:57 IST