यदु जोशी - मुंबई सर्वाधिक सदस्यांचा विश्वविक्रमी आकडा ओलांडून जागतिक पातळीवरील सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनण्याचे लक्ष्य भारतीय जनता पार्टीने निश्चित केले असून, लक्ष्यपूर्तीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची यंत्रणा कामाला लागली आहे. सध्या ८ कोटी १७ लाख सदस्यसंख्या असलेला चीनमधील कम्युनिस्ट पक्ष हा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष मानला जातो. उजव्या विचारसरणीच्या भाजपाला डाव्या पक्षाने गाठलेला हा टप्पा ओलांडायचा आहे. सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला राजकीय पक्ष म्हणून चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीची वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ गीनिज बुकात नोंद आहे. हा विक्रम मोडीत काढून कम्युनिस्टांवर मात करायचे उद्दिष्ट भाजपाने निर्धारित केले आहे. चीनमध्ये सरकारी कर्मचारी आणि संरक्षण दलाच्या जवानांना कम्युनिस्ट पक्षाचे आजन्म सदस्य व्हावे लागते. त्यामुळे त्यांना १ कोटी ७० लाख इतकी सदस्यसंख्या आयतीच मिळाली आहे. भारतात सरकारी कर्मचाऱ्यास कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य होण्यास मनाई आहे. भाजपाच्या सदस्य नोंदणीला गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी देशव्यापी प्रारंभ करण्यात आला होता. ही नोंदणी ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या नेटवर्कवरच अवलंबून न राहता कुणालाही भाजपाचे सदस्य होता यावे यासाठी पक्षाने टोल फ्री नंबरची शक्कल शोधली. या नंबरवर फक्त मिस्ड् कॉल दिला तरी भाजपाचे सदस्य होता येते. पक्ष कार्यालयाकडून त्या क्रमांकावर संपर्क साधून सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. च्आतापर्यंत भाजपाची सदस्यसंख्या ७ कोटी ९७ लाख इतकी असून, १४ कोटी जणांनी सदस्य नोंदणीसाठीच्या टोल फ्री नंबरवर मिस्ड् कॉल देऊन सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. च्चिनी कम्युनिस्ट पक्षाला मागे सोडून जगातील सर्वांत मोठा पक्ष होण्याचे लक्ष्य आम्ही साध्य केले असून, औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. ती होताच मोठे सेलिब्रेशन केले जाईल, असे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख डॉ. दिनेश शर्मा यांनी सांगितले.महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर १९ नोव्हेंबरपासून सदस्य नोंदणी सुरू झाली. आजपर्यंत ७१ लाख ८३ हजार इतकी सदस्य नोंदणी झाली असून, १ कोटी सदस्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. - सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेश सदस्य नोंदणी प्रमुख
विश्वविक्रमी सदस्य नोंदणी भाजपाचे लक्ष्य
By admin | Updated: March 22, 2015 01:45 IST