ऑनलाइन लोकमत
शिवसेना, भाजपातील वादाला नवी फोडणी
मुंबई, दि. 14 - आगामी निवडणुकीपूर्वी भाजपा सरकार आपले महत्वाकांक्षी प्रकल्प महापालिकेच्या गळी उतरवण्याच्या प्रयत्नात आहे. मेट्रो प्रकल्प ३ साठी १७ भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिल्यानंतर आता पालिकेच्याच पैशांनी स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्याची तयारी सुरु आहे. मात्र मित्रपक्षाचे हे छुप्पे मनसुबे उधळून लावण्यासाठी शिवसेनेचीही मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यामुळे उभय पक्षांमध्ये निवडणुकीपूर्वी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी भूखंड देण्यास नकार देणारा ठराव पालिका सभागृहात मंजूर करून शिवसेनेने भाजपची कोंडी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी हा ठराव रद्द करीत तातडीने हे भूखंड मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. परंतु या प्रकल्पात बाधित नागरिकांच्या पुर्नवसनाचा ठोस आराखडा सादर होईपर्यंत विरोध कायम असेल असा इशारा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आज दिला.
श्रेयासाठी स्मार्ट आईडिया
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पालिकेने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला नाही. तरीही राज्य सरकारने पालिकेला स्वखर्चाने स्मार्ट सिटी संकल्पना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार फिटवाला मार्गापासून एलफिन्स्टन स्टेशनपर्यंत पर्जन्य जलवाहिन्यांच्या रुंदीकरणाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत होत असल्याची नोंद पालिकेने केली आहे. यावर आक्षेप घेत हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्याची सूचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली, मात्र असा प्रस्ताव अडवून शिवसेना जनतेचे नुकसान करीत आहे, अशी नाराजी भाजपने व्यक्त केली त्यामुळे खवळलेल्या शिवसेनेने या प्रस्तावावर मतदान घेत मित्रपक्षची खेळी उधळली.
मेट्रोवरुन खडाजंगी
कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेचे १७ भूखंड तात्पुरत्या स्वरूपात तर २४ भूखंड कायमस्वरूपी लागणार आहेत. ज्याशिवाय मेट्रो ३ चे काम सुरू करणं शक्य नाही. शिवसेनेने यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचा मुद्दा हाती घेत रस्त्यावरची लढाई हाती घेतली. शिवाय पालिकेत हे भूखंड मेट्रो ३ प्रकल्पाला देण्यास विरोध करणारा ठराव पास करत भाजपला अडचणीत आणले. मुख्यमंत्र्यांनी शेवटी आपल्या अधिकारांचा वापर करून हे भूखंड त्वरीत मेटृो ३ ला हस्तांतरित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. यामुळे शिवसेना आणि भाजपात नव्याने वादाला तोड़ फुटले आहे.
विरोधी पक्षही आक्रमक
* भाजपा आपला प्रकल्प पालिकेवर थोपत आहे. अशावेळी शिवसेना मंत्रिमंडळात या प्रस्तावाला विरोध करण्याची हिम्मत दाखवणार का असा सवाल मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
* प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन झाल्याशिवाय हा प्रकल्प होऊ देणार नाही, एमएमआरडीए कडे बरेच भूखंड आहेत. पालिकेला या भूखंडाच्या मोबदल्यात प्राधिकारणाने आपले भूखंड द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेता प्रवीण छेड़ा यांनी केली आहे.