ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. तर शिवसेनेला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागेल असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
राज्यातील २८८ जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले असून सुमारे ६२ टक्के मतदारांनी ४,११९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. युती व आघाडीमध्ये झालेल्या घटस्फोटामुळे यंदा राज्यात पंचरंगी निवडणूक रंगली आहे. मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे म्हटले आहे.
सी व्होटरनुसार राज्यात भाजपला २८८ पैकी १२९ जागांवर विजय मिळेल. तर शिवसेनेला ५६, काँग्रेसला ४३, राष्ट्रवादी काँग्रेसला ३६, मनसेला १२ आणि अन्य १२ जागांवर समाधान मानावे लागेल. तर नेल्सनच्या पोलनुसार भाजपला १२७, शिवसेनेला ७७, काँग्रेसला ४०, राष्ट्रवादी काँग्रेसला ३४ आणि मनसेला ५ जागा मिळतील असा अंदाज आहे. टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असे म्हटले आहे. भाजपला तब्बल १५१ जागांवर विजय मिळेल अशी अशी शक्यता चाणक्यने वर्तवली आहे. तर शिवसेनेला ७१, काँग्रेसला २७, राष्ट्रवादी काँग्रेसला २८ आणि मनसेला ११ जागांवर विजेय मिळेल असा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात बहुमतासाठी १४४ चे मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे.
हरियाणामध्येही भाजपलाच बहुमत मिळेल असे एक्झिट पोलमध्ये मिळेल. हरियाणामध्ये ७३ टक्के मतदान झाले आहे.