पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. शिवसेनेने ६४, तर भाजपाने ८८ जागांचा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवला आहे. शिवसेनेचा ‘फिप्टी-फिप्टी’चा प्रस्ताव भाजपाला आणि भाजपाचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य असल्याचा सूर आहे. त्यामुळे युतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती करा, असे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांत चर्चेचे गुऱ्हाळ आठवडाभरापासून सुरू झाले आहे. वाकड येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री युतीबाबत बैठक झाली. शिवसेनेचे उपनेते विनायक राऊत, संपर्क नेते डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, भाजपाच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे आदी उपस्थित होते. युतीच्या जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा करावी, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहावा आणि एकत्रित काम करून महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पुढील बैठकीत युतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचीही मागणीही केली.(प्रतिनिधी)>युतीसाठी शिवसेना सकारात्मक आहे. शिवसेनेच्या वतीने आम्ही पन्नास टक्के जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनीही आम्हाला प्रस्ताव दिला आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवरील नेते चर्चा करतील. पुढील बैठकीत याबाबत निर्णय अपेक्षित आहे.- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना>शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सकारात्मक आहे. पालिकेत सत्ता येण्यासाठी युती आवश्यक आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जागांचा मुद्दा न करता जे काही सकारात्मक करता येईल, ते करण्याची भाजपाची तयारी असेल.- लक्ष्मण जगताप, आमदार, शहराध्यक्ष, भाजपा
‘फिफ्टी-फिफ्टी’ला भाजपाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 02:15 IST