नाशिक : स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरून भाजपा-शिवसेनेत रण पेटले असून, त्याचे पडसाद मंगळवारी नाशिकमध्ये उमटले. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याचे समर्थन केल्याचा आरोप करीत भाजपाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी धुडगूस घातला. शिवसैनिकांनी केलेल्या खुर्च्यांच्या फेकाफेकीत महिला व मुले जखमी झाले. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते हटून बसले होते.श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र व्हावा ही जुनीच मागणी असल्याचे रहाटकर यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. माध्यमांमधून हे समजल्यानंतर शिवसैनिकांनीही व्यूहरचना केली. सायंकाळी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि भाजपा महिला आघाडीच्या वतीने मेळावा तसेच विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कारार्थींचे मनोगत सुरू असतानाच शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संघटनप्रमुख सत्यभामा गाडेकर तसेच अन्य महिला तसेच पुरुष शिवसैनिक कार्यक्रमस्थळी घोषणा देत घुसले आणि वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा मागणाऱ्यांचा धिक्कार असो, घोषणा देत गोंधळ घातला. खुर्च्या उचलून फेकण्यास सुरुवात केल्याने उपस्थित महिला आणि अन्य कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली. सेना स्टाइलने उत्तर देण्याच्या प्रकारात अनेक महिला आणि दोन लहान मुलांना खुर्च्या लागल्याने ते जखमी झाले. पोलीस तेथे पोहोचेपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार बंद करून घेतले आणि सेनेच्या महिला कार्यकर्त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर पोलीस आले आणि धरपकड सुरू झाली. सभागृहाच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी अटक करण्याची मागणी केली. कार्यक्रम नंतर सुरळीत सुरू झाला. (प्रतिनिधी)‘लिव्ह इन...’मध्येवाढती फसवणूक‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग विशेष प्रयत्न करीत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. १९९३ पासून आयोगाकडे प्रकरणे प्रलंबित असून गेल्या दीड महिन्यात पाच हजार प्रकरणांची विगतवारी करून आता केवळ पंधराशे प्रकरणे शिल्लक राहिली आहेत, असे त्या म्हणाल्या.
सेनेने भाजपाचा मेळावा उधळला!
By admin | Updated: March 23, 2016 04:13 IST