भिवंडी : तालुक्यातील कशेळी येथे पोलिसांनी हस्तक्षेप करून अल्पवयीन मुलीचे लग्न रोखून वयाच्या १८ वर्षांनंतरच तिला लग्नाच्या बेडीत अडकविण्याचे पालकांकडून लिहून दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची मुक्तता केली.कल्याण तालुक्यातील अटाळी वडवली गावातील योगेश भक्तप्रल्हाद भोईर (२५) याचे कशेळी गावातील श्वेता प्रकाश पाटील (१५) हिच्यासोबत गुरुवारी लग्न आयोजित केले होते़ ही खबर नारपोली पोलिसांना लागली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आकडे हे घटनास्थळी गेले. समारंभाच्या ठिकाणी असलेल्या प्रतिष्ठित वऱ्हाडींना कायद्याने अल्पवयीन मुलीचे लग्न करता येणार नाही, असे त्यांनी सांगितल्यानंतर समारंभासाठी आलेल्या सर्वांना वधूवरांना आशीर्वाद न देताच परत फिरावे लागले. लग्नात विघ्न आल्याने काहींना आपले अश्रू आवरता आले नाही. वधू पक्षाला केलेला खर्च वाया गेल्याचे दु:ख झाले. या वेळी वधू-वर पक्षांकडून पोलिसांनी मुलीचे लग्न १८ वर्षांनंतर करणार, असे लिहून घेऊन त्यांची सुटका केली. या घटनेचे परिसरात चांगलेच पडसाद उमटले आहेत़ (प्रतिनिधी)
भिवंडीत पोलिसांनी रोखला बालविवाह
By admin | Updated: February 14, 2015 04:12 IST