अकोला : तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ता तथा भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी अकोला जिल्ह्यात २०१७ साली सुरू केलेल्या ‘एक जन्म- एक वृक्ष’ मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविकांमार्फत शुक्रवारपासून याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी दिल्या आहेत.राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना २१ मे रोजी याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.नाथन २०१५पासून अकोला जिल्ह्यात वृक्ष संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून आॅक्टोबर २०१७मध्ये आरोग्य विभागामार्फत ‘एक जन्म-एक वृक्ष’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या मोहिमेंतर्गत ज्या कुटुंबात नवजात बालकांचा जन्म होईल, त्या कुटुंबाच्यावतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते.या वृक्षाचे जतन करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका कुटुंबास प्रोत्साहित करीत आहेत.या उपक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींनी १४ मे रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक सतीश पवार यांच्या मुंबई येथील कार्यालयात या योजनेचे सादरीकरण केले. या उपक्रमाची दखल घेत संपूर्ण राज्यात ‘एक जन्म-एक वृक्ष’ योजनेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत करण्यात यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
‘एक जन्म-एक वृक्ष’ राज्यभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:38 AM