गडचिरोली : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेत २५ कोटीचा अपहार झाल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणाची पाळेमुळे राज्यभर पसरलेले असल्याचे निष्पन्न आले आहे. आता सदर प्रकरणात राज्यपातळीवर तपास करण्यासाठी सीबीआय व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग काम करणार आहे. या घोटाळ्याचा योग्य दिशेने तपास झाल्यास अनेक मोठ्या संस्थांसह सरकारी अधिकारी गळाला लागण्याची शक्यता आहे़ गडचिरोलीसह वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, बुलडाणा,परभणी, बीड, जळगाव, नंदूरबार, नाशिक आदी भागात तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था उघडून यात बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती हडपण्याचा प्रकार सुरू होता. २०१० पासून राष्ट्रभाषा ज्ञानमंडळ वर्धा व एमएसबीईटीचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी कोट्यवधीची शिष्यवृत्ती लाटण्याचे काम सुरू केले होते. गडचिरोली जिल्ह्यात ‘लोकमत’ने डिसेंबरमध्ये सर्वप्रथम याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर आदिवासी विकास विभागाची गडचिरोली जिल्ह्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली व पहिला गुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल करण्यात आला़ या घोटाळ्याची व्याप्ती इतर जिल्ह्णांतही पसरल्याचे वास्तव वृत्तमालिकेद्वारे लोकमतने चव्हाट्यावर आणले़ गडचिरोली जिल्ह्यात १७ ते १८ महाविद्यालयांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आदिवासी विकास विभागाचे गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके, सामाजिक न्याय विभागाचे सहायक समाज कल्याण अधिकारी तुकाराम बरगे यांना राजपत्रित अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. ‘लोकमत’कडे अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या. पोलिसांनी या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातून अनेक संस्थाचालकांना अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या घोटाळ्याशी संबंधित आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सीबीआय चौकशीतून बडे मासे गळाला ?
By admin | Updated: April 11, 2015 02:08 IST