घोटाळ्यांचा आरोप : विशेष तपास पथकाने नोंदवला जबाबमुंबई : महाराष्ट्र सदनसह अनेक घोटाळ्यांप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी राज्याचे माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची चौकशी केली. एसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) भुजबळ यांची कसून चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला. त्यांना यापुढेही चौकशीसाठी बोलावले जाईल, असे संकेत एसीबीने दिले आहेत. एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांना विचारले असता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भुजबळ यांची चौकशी केल्याचे ते म्हणाले. आपच्या नेत्या अंजली दमानिया व इतरांच्या रिट याचिकेवरून उच्च न्यायालयाने भुजबळ व कुटुबियांची उघड चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २० फेब्रुवारीपासून एसीबीने पुतणे आणि माजी खा. समीर भुजबळ यांच्यापासून उघड चौकशीला सुरूवात केली. त्यानंतर आजतागायत अनेक फेऱ्यांमध्ये पुतणे समीर, चिरंजीव पंकज, सार्वजनिक बांधकाम विभागातले आजी-माजी अधिकारी, दलाल, कंत्राटदार कंपन्यांचे संचालक अशा अनेकांची चौकशी करून एसआयटीने जबाब नोंदवून घेतले आहेत. मात्र भुजबळ यांची या प्रकरणात पहिल्यांदाच चौकशी झाल्याचे एसीबीने सांगितले.
भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी
By admin | Updated: May 1, 2015 02:35 IST