मुंबई : मध्य भारतावर अजूनही पश्चिमी प्रकोपाचा(वेस्टर्न डिस्टर्बन्स) प्रभाव कायम असल्याने ३ आणि ४ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे दिला आहे. त्याचप्रमाणे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि मुंबईत हवामान ढगाळ राहील, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.उत्तर भारतात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तेथील पावसाचे ढग मध्य भारतावर सरकले आहेत. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून राज्यासह मुंबईत अवकाळी पाऊस पडत आहे. पुढील ४८ तास हीच परिस्थिती राहणार आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विजेची मागणी घटली असून, या तीन दिवसांच्या काळात राज्यात सरासरी दिवसागणिक ६० मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.या अवकाळी पावसादरम्यान २७ फेब्रुवारी रोजी सकाळी विजेची मागणी १६ हजार ११४ मेगावॅट होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ९९ मेगावॅट होते. त्याच दिवशी सायंकाळी विजेची मागणी १३ हजार ६३६ मेगावॅट एवढी होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ६४ मेगावॅट होते. (प्रतिनिधी)च्ठाणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंब्याच्याबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाणे, पालघर या दोन जिल्ह्यांमधील सुमारे ७१० हेक्टर क्षेत्रावर आंब्याच्या बागा आहेत. यापैकी बहुतांश् आंब्याचा मोहोर आणि फळे गळून पडली. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत.च्जिल्ह्यात दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे १६५.२० मिमी पाऊस पडला. या पावसामुळे भाजीपाला आणि कडधान्याचे काहीअंशी नुकसान झाले आहे. वाल, हरबरा या कडधान्यासह काही प्रमाणात भेंडी, मिरची, गवार आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आदी तालुक्यांमध्ये झाला. यात अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून वीटभट्ट्या आणि गुरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे़ अलिबाग : रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, वाल आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पिक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात १६ हजार ८२४ हेक्टर आंबाक्षेत्रापैकी ६ हजार ७१२ हेक्टरवरील आंबा पिकास पावसाचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे ३ हजार ७७६ हेक्टर काजू क्षेत्रापैकी २ हजार ४५६ हेक्टरातील काजू पिक बाधीत झाले आहे. याशिवाय वाल, पांढरे कांदे, तोंडली अशा ७०७ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला क्षेत्रासही या पावसाचा मोठा फटका बसल्याची माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे यांनी दिली आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शासनाकडून पंचनामा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकसान भरपाईपोटी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज जाहीर केले.विजेची मागणी घटली२८ फेब्रुवारी रोजी सकाळी विजेची मागणी १६ हजार २०९ मेगावॅट होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ६२ मेगावॅट होते. त्याचदिवशी सायंकाळी विजेची मागणी ११ हजार ८११ मेगावॅट एवढी होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ६१ मेगावॅट होते.१ मार्च रोजी सकाळी विजेची मागणी ११ हजार २१९ मेगावॅट होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ५८ मेगावॅट होते. त्याच दिवशी सायंकाळी विजेची मागणी ८ हजार १२९ मेगावॅट एवढी होती़ या वेळी करण्यात आलेल्या विजेच्या भारनियमनाचे प्रमाण ५६ मेगावॅट होते. दिवसागणिक राज्याला १५ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी असते आणि त्या तुलनेत तेवढ्याच विजेचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.