मुंबई : गदीर्ची वेळ पाहून अपंगांच्या डब्यात हळूच घुसून प्रवास करण्याची तुमची सवय असेल तर आता तुम्हाला लगेच पकडले जाऊ शकते. आरपीएफच्या संवेदना या नव्या पथकाची आता अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांवर नजर असणार आहे. लोकलमध्ये अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून अन्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. त्यामुळे अपंग प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हे पाहता अन्य प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफने (रेल्वे पोलिस दल) ‘संवेदना’ पथक तयार केले आहे. गर्दीच्या वेळेत अपंगांच्या डब्यात प्रचंड घुसखोरी होत असल्याने या वेळेतच घुसखोरी पथकाकडून रोखली जाणार आहे. गुरुवारपासूनच (९ एप्रिल) या पथकाची गर्दीच्या स्थानकांवर नेमणूक करण्यात आल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. लोकलमधून अपंगांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एक स्वतंत्र डबा त्यांच्यासाठी आरक्षित ठेवला जातो. मात्र हा डबा आरक्षित ठेवला गेला तरी अन्य प्रवाशांकडून या डब्यात घुसखोरी केली जाते. त्याला अपंग प्रवाशांकडून विरोध केला गेला तरी अन्य प्रवाशांकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे प्रसंगी वादही होतात. अपंगांच्या डब्यातील घुसखोरी थांबविण्यात यावी, अशी मागणी बऱ्याच वेळा या प्रवाशांकडून करण्यात आली आहे. तरीही त्याकडे दुर्लक्षच होताना दिसले. मात्र आता मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांमध्ये अपंगांच्या डब्यात होणारी घुसखोरी थांबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन आणि आरपीएफने घेतला आहे. त्यासाठी संवेदना नावाचे रेल्वे पोलिसांचे पथकही तयार करण्यात आले असून गुरुवारपासून या पथकाची गर्दीच्या स्थानकांवर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक गर्दीच्या वेळी अपंगांच्या डब्यात मोठ्या प्रमाणात होणारी घुसखोरी रोखणार असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागिय सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा यांनी सांगितले. यासाठी आठ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. सकाळी आठ ते सकाळी ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे पथक गर्दीच्या स्थानकांवर असेल, असेही बोहरा यांनी सांगितले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, दंड न भरल्यास जेलची हवा खावी लागणार आहे.
सावधान! अपंगांच्या डब्यात शिराल तर...
By admin | Updated: April 11, 2015 02:34 IST