कारखान्यातील केमिकल नाल्यात : गावकऱ्यांचा जीव धोक्यात जीवन रामावत - नागपूरबुटीबोरी परिसरातील वाठोडा या गावाशेजारच्या एका नाल्यात कंपनीतील भयंकर घातक विषारी केमिकल टाकले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ते केमिकल एवढे भयंकर आहे, की त्यामुळे परिसरातील हजारो गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच परिसरातील शेकडो एकर सुपीक शेतीचे पोत खराब होऊन व विहिरींचे पाणी विषारी झाले आहे. विशेष म्हणजे, गत चार वर्षांपासून येथे हा प्रकार सुरू असताना, त्याची स्थानिक प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. शिवाय ते केमिकल कुठून येते व कोण टाकतो, याचाही अजूनपर्यंत सुगावा लागलेला नाही. गावकऱ्यांच्या मते, मध्यरात्रीच्या अंधारात टॅँकर येतो, आणि केमिकल नाल्यात टाकून निघून जातो. मागील चार वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन वेळा हा प्रकार घडतो. त्याचा दुष्परिणाम आता परिसरातील नागरिकांना भोगावा लागत आहे. अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी वाठोडा या गावातील नागरिक अशोक भापकर, किशोर बावनकुळे व संजय ठाकरे यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह, मंत्री, आमदार, पोलीस, नीरी, कृषी विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्या तक्रारींची कुणीही दखल घेतली नाही. ‘वेणा डॅम’ही दूषित चार वर्षांपासून केमिकल टाकले जात असलेल्या नाल्यापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर ‘वेणा डॅम’ आहे. उन्हाळ्यात या नाल्याला पाणी नसते. परंतु पावसाळा सुरू होताच, या नाल्यातील संपूर्ण पाणी वेणा डॅममध्ये जाते. त्यामुळे वर्षभर त्या नाल्यात टाकल्या जात असलेले विषारी केमिकल पावसाच्या पाण्यासोबत डॅममध्ये पोहोचते. त्यानुसार नुकताच पाऊस पडला असून, त्या पाण्यासोबत नाल्यातील विषारी केमिकल थेट वेणा डॅममध्ये पोहोचले आहे. विशेष म्हणजे, या वेणा डॅममधील पाण्याचा परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पुरवठा केला जातो. अशा स्थितीत प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही, तर फार मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हजारो गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच नाल्यातील पाणी परिसरातील जनावरे पित असल्याने त्यांच्याही जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाठोड्याला विषाचा विळखा
By admin | Updated: July 21, 2014 01:00 IST