नवी मुंबई : बारच्या अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईनंतरही त्या ठिकाणी अनधिकृतपणे बार चालवला जात असल्याचा प्रकार कोपरखैरणेत पाहायला मिळत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून त्या जागेचा वापर संबंधिताकडून होत आहे. त्या ठिकाणी उघड्यावर मद्यपान होत असून, पदपथालगत टेबल मांडून ग्राहकांना बैठकीची सोय करून दिली जात आहे.पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवार्इंचा धडाका सुरू आहे. मात्र, या कारवाईदरम्यान काही अनधिकृत बांधकामे पूर्णपणे पाडली जात नसल्याचा फायदा संबंधितांना होत आहे. यामुळे व्यावसायिक वापरासाठी झालेली अनधिकृत बांधकामे अर्धवट पाडून कारवाईचा दिखावा होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथील आदर्श बारच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने डिसेंबर महिन्यात कारवाई केलेली आहे. या कारवाईत बारच्या तळमजल्यावरील एका बाजूची भिंत पाडण्यात आली होती. मात्र, या कारवाईच्या दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा त्या जागेचा व्यावसायिक वापर सुरूच आहे. पालिकेने पाडलेल्या भिंतीच्या ठिकाणी प्लास्टिकचा पडदा तयार करून त्या ठिकाणी अनधिकृतपणे बार चालवला जात आहे. शिवाय बारच्या बाहेरही टेबल मांडून रात्रीच्या वेळी ग्राहकांच्या बैठकीची सोय करून दिली जात असल्यामुळे त्या ठिकाणी मद्यप्राशन होत आहे. रहदारीच्या मुख्य रस्त्यालगतच हा बार असल्याने त्या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकाराचा त्रास त्या ठिकाणावरून जाणाऱ्या महिला प्रवाशांना होत आहे. शिवाय बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यालगतच उभी केली जात असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या सातत्याने उद्भवत आहे. यानंतरही संबंधित प्रशासनाची त्याकडे डोळेझाक होत असल्याचे दिसत आहे. व्यावसायिक कारणासाठी झालेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईनंतरही त्या जागेचा वापर का बंद होत नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
कारवाईनंतरही अनधिकृत जागेत बार
By admin | Updated: March 2, 2017 02:41 IST