ठाणे : जागतिक वसुंधरा दिनाच्या दिवशीच १४०० वृक्ष तोडीचे प्रस्ताव पटलवार आणणाऱ्या ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आणखी एक चपराक लगावली आहे. शहरामधील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने आणि झाडांचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने यापुढे विकासकाला विकास प्रस्तावातंर्गत बाधित होणारे वृक्ष तोडण्याची परवानगी न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली १४०० वृक्ष तोडीचे प्रस्ताव पटलावर आले होते. त्याला जबरदस्तीने मंजुरीही देण्यात आली. परंतु, या संदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, आयुक्तांनी त्याची दखल घेऊन पोखरण रोड नं. २ मधील एकाही वृक्षाला बाधा होणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता हा महत्त्वाचा निर्णय घेऊन वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिकेतील काही अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ठाणे शहरात पाच लाख वृक्ष लागवड योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी आयुक्तांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपआयुक्त (उद्यान) ओमप्रकाश दिवटे यांच्यासह वन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.वृक्ष संवर्धनासाठी जयस्वाल यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची घोषणा केली आहे. या समितीत मनपा पदाधिकाऱ्यांसोबतच वृक्ष मित्रांचाही समावेश असणार आहे. वृक्षतोडीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडे जे प्रस्ताव प्राप्त होतात ते आधी या विशेष समिती समोर येतील. त्यानंतरच ते वृक्ष प्राधिकरण समिती समोर सादर करण्यात येणार आहेत. या पुढे कुठल्याही विकासकाला विकास प्रस्तावातंर्गत बाधित होणारी झाडे तोडण्याची परवानगी न देता ती झाडे त्यांनी पुनर्रोपण करण्याची परवानगी देण्यात येईल. त्याचप्रमाणे पूर्वीच्या एका झाडास ५ झाडे लावण्याचा जो नियम होता त्याऐवजी आता एका झाडासाठी १५ झाडे लावणे बंधनकारक असेल.
ठाण्यात यापुढे झाडे तोडण्यावर बंदी
By admin | Updated: April 28, 2016 03:39 IST