ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृतिदिन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे बाळासाहेबांना यांना आदरांजली वाहिली. 'नेहमी लोकांसाठी जगलेल्या आणि त्यांच्या भल्यासाठी लढणा-या बाळासाहेबांना मी अभिवादन करतो' असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजपा आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. शिवसेनेने भाजपावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला असून भाजपानेही शिवसेनेला चांगलेच तंगवून ठेवले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट शिवसेना व भाजपामधील तणाव कमी करु शकते. मोदींच्या ट्विटनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.