कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहायक आयुक्त व ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांची बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, बोराडे यांना केडीएमसी प्रशासनाने लाचखोरी प्रकरणात दुसऱ्यांदा निलंबित केले आहे. बेकायदा बांधकाम प्रकरणात बोराडे यांना शनिवारी ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाने दीड लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. बोराडे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. या वेळी बोराडे यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची विनंती अमान्य करत बोराडे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. परंतु, बचाव पक्षाच्या वकिलांनी बोराडे यांना जामीन मिळावा, असा अर्ज केला होता. हा अर्ज मान्य करीत बोराडे यांची २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता केली. असे असले तरी तपासकामात सहकार्य करण्यासाठी दर मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे.
लाचखोर बोराडेंना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 03:00 IST