सोलापूर : आजवर जे झालं ते गंगेला मिळालं. दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताकही फुंकून प्यायला लागलोय. म्हणूनच सांगतोय, बाबांनो बोलताना जरा जपून बोला...जिभेवर नियंत्रण ठेवा...कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या...असा सल्ला दुसऱ्या-तिसऱ्या कुणी नाहीतर स्वत: अजित पवार यांनी दिला आहे!आपल्या रोकठोक भाषाशैलीमुळे अजितदादा नेहमीच चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री असताना, उजनीच्या पाण्यावरून त्यांची जीभ चांगलीच घसरली होती. त्यावर बरीच टीका झाली. शरद पवारांसह इतरांनी दादांनी तोंड आवरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी कराडला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश केला. हा पूर्वानुभव गाठीशी असल्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला.अजितदादा म्हणाले, बोलताना कुणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. लोक आपले ऐकतात, भाषणावर हसतात म्हणून काहीबाही बोलत सुटू नका. आमच्या बार्शीच्या सोपलांचं भाषण तर लय गाजलं... खरं तर कधीकधी लोक हसायला लागलेत म्हणल्यावर आपण बोलतच सुटतो. नाहीतर लोकांना हसवता हसवता आपल्यावरच रडायची पाळी यायची, असा सावधपणाचा इशाराही त्यांनी दिला.विविध धर्माच्या, समाजातील महापुरुषांच्या जयंती उत्सवात हजेरी लावा, केंद्र अथवा राज्य सरकारने एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल तर आमच्या आदेशाची वाट पाहू नका. त्या निर्णयाच्या विरोधात पक्षाच्या वतीने प्रतिक्रिया उमटल्या पाहिजे. हे करीत असताना चुकीचे असे काही करु नका, कुणाची टिंगल करू नका. तुम्हाला बेरीज करता आली नाही तर किमान वजाबाकी तर मूळीच करु नका आणि आपण कुणाची स्टेपनी होणार नाही, याची काळजी घ्या,असा सल्लाही पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)
बाबांनो, जरा जपून बोला!
By admin | Updated: June 6, 2016 03:27 IST