विलास गावंडे / यवतमाळआयुर्वेद प्रथम वर्ष प्रवेश लांबल्याने विद्यापीठाची अंतिम परीक्षाही सहा महिने पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता पाच वर्षांत मिळणाऱ्या पदवीसाठी साडेपाच वर्षे खर्ची पडणार आहेत. सोबतच पदव्युत्तर परीक्षेवरही याचा परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांमधून व्यक्त केली जात आहे.खासगी, अनुदानित आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. ६३ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता ३१ आॅक्टोबर २०१६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. २९५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. परंतु या तारखेपर्यंत विविध कारणांमुळे १६२६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे पुढेही प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. अखेर ३१ आॅक्टोबरनंतर १३२४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊन प्रक्रिया थांबली. प्रवेश उशिरा झाल्याने प्रथम वर्ष अंतिम परीक्षा लांबविण्यात आली आहे.यापूर्वी ३१ आॅक्टोबरनंतर प्रवेशित विद्यार्थ्यांचीच परीक्षा हिवाळी सत्रात घेण्यात येत होती. यावर्षी मात्र सरसकट सर्व विद्यार्थ्यांवर हा निर्णय लादण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकरणात समानता आणण्याच्या दृष्टीने, आवश्यक शैक्षणिक कालावधी पूर्ण होण्यासाठीच प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जून-जुलै ऐवजी नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ या सत्रात घेण्यात येत असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या परीक्षा नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे.
आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सहा महिने लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 04:06 IST