मुंबई : राज्यात पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन स्विमिंग पूलना पाणी देणे तूर्त बंद करावे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांना सांगितले. होळीनिमित्त होणारे रेनडान्स टाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचा अपव्यय टाळणे महत्त्वाचे आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांच्या पाणीपुरवठ्यातदेखील कपात करावी लागत आहे. आम्ही सर्व महापालिका आणि नगरपालिकांना पत्र पाठवून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. होळीनिमित्त रेनडान्सवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. रेनडान्स टाळावे असे सरकारचे आवाहन आहे. राज्यातील जलाशयांमध्ये सरासरी केवळ २६ टक्केच पाणी शिल्लक आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यातील जलाशयांमध्ये केवळ ५ टक्के पाणी बाकी आहे. एवढ्या पाण्यावर आणखी चार महिने भागविण्याचे आव्हान आहे. अर्थात इतरही उपाययोजना करण्यात येत आहेत. (विशेष प्रतिनिधी)
रेनडान्स टाळा!
By admin | Updated: March 17, 2016 04:10 IST