ऑनलाइन लोकमत -
जलयुक्त परिसर: दहा कोटी लिटर पाणी साठवणार
औरंगाबाद, दि. 09 - शहर परिसरात झालेल्या दमदार पावसाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसरातील तलाव, चर आणि नाले तुडुंब भरले असून ख-या अर्थाने विद्यापीठ ‘जलयुक्त’ झाले आहे.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने जानेवारी महिन्यापासूनच ‘जलयुक्त विद्यापीठ’ अशी घोषणा देऊन त्या दिशेने काम सुरू केले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांनी पुढाकार घेऊन काम सुरू केले. सुरुवातीला ‘कमवा- शिका’ योजनेतील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून नाले खोलीकरण आणि इतर कामे केली. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात पाच पोकलेन आणि वीस ट्रॅक्टरच्या सहाय्याने विद्यापीठ परिसरातील नाले खोलीकरण तसेच रुंदीकरणाचे काम करण्यात आले. आवश्यक तेथे बांध घालून पाणी अडविण्याची सोय करण्यात आली. चार बंधा-यांची क्षमता वाढविण्यात आली. विहिरींतील गाळ काढण्यात आला. लेणी परिसर ते गोगाबाबा टेकडीच्या पायथ्यापर्यंत सुमारे दीड किलोमीटर सहा फूट रुंद आणि पाच फूट खोल चर खोदण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या तसेच मंगळवारच्या मुसळधार पावसाने ही चर पूर्णत: भरून गेली आहे. याशिवाय विद्यापीठ परिसरातील चारही बंधारे तुडुंब भरले आहेत. एप्रिल- मे महिन्यात केलेल्या उत्तम कामाचा परिणाम यंदाच्या पावसाळ्यात दिसून आला. नालेही तुडुंब भरले असून बंधाºयावरून पाणी ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. बंधाºयांची क्षमता वाढविल्याने तसेच विहिरीतील गाळ काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण झाली आहे.
या कामासाठी विद्यापीठाने आपल्या निधीतून १० लाख रुपये खर्च केले. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शासनाकडून २५ लाख रुपयांचा निधी दिला. आणखी २५ लाखांचा निधी विद्यापीठाला मिळणार आहे. जलसंधारणाचे काम उत्तम चालत असल्याचे पाहून डॉ. दांगट यांनी दोनवेळा या कामाला भेट दिली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचारी संघटना यांचीही साथ लाभली.