औरंगाबादपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा परिषदेतही शिवसेनेची काँग्रेससोबत सोयरिक ?कोल्हापूर : औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळविणी केल्याच्या वृत्तापाठोपाठ कोल्हापूर जिल्हा परिषदेतही दोन्ही काँग्रेससोबत सोयरिक करण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत मुंबईतून मिळाले आहेत. आदेश प्राप्त होताच शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन करेल, अशी चिन्हे आहेत. याला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी दुजोरा दिला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी कागल पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीप्रसंगी मंडलिक यांनी ही माहिती दिल्याने कोल्हापुरच्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेशिवाय कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे योग्य सन्मान देतील त्यांच्याशी युती केली जाईल, असे सांगत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सत्तेसाठी पाठिंब्याबाबत कॉँग्रेस आघाडीकडेच कल असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. शिवसेनेला गृहित धरुन कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आटापिटा करत असतानाच शिवसेनेने मात्र भाजपलाच दूर ठेवण्याची तयारी सुरु केल्याचे यावरुन स्पष्ट होते आहे. रविवारीच शासकीय विश्रामगृहावर संपर्कप्रमुख दुधवडकर यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली होती. या बैठकीत सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्याशी दुधवडकर यांनी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, मंडलिक यांनी याआधीच आपला अहवाल दिला आहे. दुधवडकर यांनी एकीकडे पक्ष श्रेष्ठींकडे प्रस्ताव दिल्याचे सांगितले, मात्र नंतर त्यांनी त्यात बदल करीत अजूनही काहीही ठरलेले नाही. स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांशी, स्थानिक आमदारांशी अजूनही चर्चा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात १५ मार्च रोजी पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, कागलमध्ये दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मुश्रीफ गट पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी झाला आहे. तब्बल ३५ वर्षांनतर संजय घाटगे गट कागल पंचायत समितीच्या सत्तेतून बाहेर पडला आहे.
औरंगाबादपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा परिषदेतही शिवसेनेची काँग्रेससोबत सोयरिक ?
By admin | Updated: March 14, 2017 16:31 IST