रोहा : रोहा तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी उभारण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने अंदाजे ५०हून अधिक प्रेक्षक जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली असून, जखमींवर वेगवेगळ्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.स्टेजच्या डाव्या बाजूला ६०० ते ७०० प्रेक्षक बसण्यासाठी गॅलरी उभारण्यात आली होत. मात्र अतिउत्साही प्रेक्षकांनी गॅलरीमध्ये गर्दी केल्याने सुमारे १०००हून अधिक प्रेक्षक या गॅलरीत उभे राहिल्याने गॅलरी कोसळली. या दुर्घटनेत ५० हून अधिक जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आहे. जखमींना खासगी तसेच रोहा उप जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना अलिबाग, माणगाव तसेच पनवेल, मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर अनेकांनी आपापल्या परीने जखमींना मदतीचा हात पुढे केला. कबड्डीचा सामना सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. आमदार सुनील तटकरे यांनी रात्री उशिरा रोह्यात येऊन जखमींची विचारपूस करून अधिक उपचारासाठी डॉक्टरांना सूचना दिली. या घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार सुरेश काशिद यांनीही दवाखान्यात जाऊन रु ग्णांची पाहणी केली. सरपंच विनोद पाशिलकर, विजयराव मोरे, धनश्याम कराळे, हेमंत कांबळे यांच्यासह सोनारसिद्ध क्र ीडा मंडळाने मदतकार्य केले. रोहा पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.अनिल मेश्राम, काळे, पो. ह. मरखंडे, पो.ह.म्हात्रे हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
कबड्डी सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरी कोसळली
By admin | Updated: March 6, 2017 05:23 IST