ऑनलाइन लोकमतशेगाव (बुलडाणा), दि. 22 - शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेगावात भूमिमुक्ती मोर्चाकडून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी प्लॅटफॉर्मवर मुंबईकडे जाणारी गीतांजली एक्स्प्रेस समोर आंदोलकांनी ठाण मांडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन उधळून लावले.भूमिहीनांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी यावर शासनाकडून उपायोजना करणे आवश्यक असतांना शासनाचे दुर्लक्ष होत आहे, पाळा येथील आदिवासी मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, भूमिहीन शेतकऱ्यांची व मजुरांची कर्जातून मुक्ती व्हावी, आदिवासी वन हक्क पारंपरिक वन निवासी कायदा २००६-२००८ नुसार भूमिहीनांच्या उत्थानासाठी त्यांना वन जमिनी देण्यात याव्यात, यासह एकूण १५ मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेगावात भूमिमुक्ती मोर्चाचे प्रमुख प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकावर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक विश्राम भवनासमोर सकाळपासूनच आंदोलक गोळा होत गेले यानंतर अचानकपणे त्यांनी रेल्वे स्थानकाकडे आगेकूच करीत आपल्या मागण्यांबाबत मोर्चा रेल्वे स्थानकावर धडकविला. यावेळी रेल्वे रोखण्यापूर्वी आरपीएफचे ठाणेदार बढे, पीएसआय डोंगरे, कवाळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, शहर पो.स्टे.चे ठाणेदार यशवंत बावीस्कर आदींनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेत रेल्वे रोको आंदोलन उधळून लावले. यावेळी स्थानकावर उभी असलेल्या गीतांजली एक्स्प्रेससमोर आंदोलकांनी नारेबाजी केली.
शेगावात रेल्वे रोखण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 19:52 IST