उस्मानाबाद : सहायक पोलीस फौजदार समियो रहेमान काझी यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली़ मंंगळवारी सकाळी ही घटना घडली. काझी यांना लाचखोरी प्रकरणी अटक झाली होती.अंबी (ता़ परंडा) पोलीस ठाण्यांतर्गत आनाळा दूरक्षेत्राचे सहायक फौजदार काझी यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार उस्मानाबाद एसीबीकडे आली होती़ त्यावरून एसीबीच्या पथकाने सोमवारी परंडा येथील एका हॉटेलात कारवाई करून काझी यांना रंगेहाथ पकडले होते़ परंडा पोलीस ठाण्यात त्याचा गुन्हा दाखल झाला होता. पुढील तपासासाठी पथकाने काझी यांना अटक करून उस्मानाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास काझी बाथरूमला गेले़ बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी बाथरूममध्ये पाहिले असता खिडकीच्या गजाला काझी यांनी गळफास घेतल्याचे दिसले़ तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी चित्रीकरण करून घटनेचा पंचनामा केला़ काझी यांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जमावाने पार्थिव शवविच्छेदनासाठी नेऊ दिले़ इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी पार्थिव सोलापूर रुग्णालयात पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
सहायक फौजदाराची आत्महत्या
By admin | Updated: October 15, 2014 03:22 IST