मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. राज्यात काँग्रेसचा प्रभाव वाढत असून लोकसभेवेळी झालेल्या चुका सुधारत आगामी विधानसभा जिंकणारच, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना रविवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी अमरावती आणि नागपूर विभागातील ११ जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विलास मुत्तेमवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी मुलाखती घेतल्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा प्रभाव दिसणार नसल्याचे सांगितले. विधानसभेची लढाई वेगळी आहे. तसेच लोकसभेतील चुका टाळून विधानसभा जिंकणारच, असे ते म्हणाले. मागील विधानसभेत काँग्रेसने १७४ जागा लढविल्या. या १७४ जागांव्यतिरिक्त अन्य मतदारसंघांतूनही काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे. मात्र आघाडीतील जागावाटपाचा अद्याप निर्णय झालेला नाही. जागावाटपानंतरच याबाबत विचार करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विधानसभा जिंकणारच!
By admin | Updated: August 18, 2014 03:36 IST