उरण : जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाला कायमस्वरूपी वीजपुरवठ्याची घोषणा करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आठवे मंत्री ठरले आहेत. वेळोवेळी मंत्र्यांनी दिलेली आश्वासने अरबी समुद्रातच वाहून गेल्याने कायमस्वरूपी विजेअभावी एलिफंटावासीयांना आजही अंधारातच चाचपडावे लागत आहे. एलिफंटा बेट आणि त्यावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर अशा तिन्ही गावांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही कायमस्वरूपी वीजपुरवठा झालेला नाही. कायमस्वरूपी वीजपुरवठ्याची घोषणा करण्यात मात्र सत्तेवर आलेले सर्वच राजकीय पुढारी आघाडीवर होते. १७ एप्रिल रोजी भाऊचा धक्का-मोरादरम्यान स्पीड बोटसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठ्याच्या योजनेकामी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वीजपुरवठ्याच्या योजनेबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्याचे आश्वासन दिले. एलिफंटावर कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस हे आठवे मंत्री आहेत. सरकारकडून वीजपुरवठ्याच्या योजना अनेकदा जाहीर केल्या आहेत. विद्युत जनित्रांमार्फत वीजपुरवठा, सौरऊर्जा प्रकल्प, समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मिती, पवनचक्की अशा खर्चीक प्रयोगांचीही चाचपणी झाली. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूनही बेटावरील कायमस्वरूपी अंधार दूर करणे कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारला अद्याप तरी शक्य झाले नाही. (वार्ताहर)
वीजपुरवठ्याच्या घोषणेची मंत्र्यांकडून अष्टमी
By admin | Updated: April 22, 2015 04:06 IST