ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणा-या नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राज्यात नेतृत्वबदल केले असून खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक व त्यानंतर विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पार दैना उडाली होती. यापार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोमवारी विविध राज्यांमध्ये नेतृत्व बदल केले. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियु्क्ती केली होती. आदर्श घोटाळा व पेड न्यूज प्रकरणामुळे चव्हाण गोत्यात आले असले तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला आहे. राज्यात काँग्रेस तिस-या क्रमांकावर फेकला गेला असून काँग्रेससमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करुन राज्यात काँग्रेससाठी अच्छे दिन आणण्याचे आव्हान चव्हाण यांच्यासमोर आहे. तर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेल्या संजय निरुपम यांना मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याची खडतर परीक्षेला सामोरे जावे लागेल.
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजय माकन, तेलंगण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तम रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.