श्रीनगर : फुटीरवादी नेत्या आणि कट्टरपंथी महिला संघटना दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख आसिया अंदराबी हिला शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली. बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात पाकिस्तानी झेंडा फडकविल्याबद्दल आसियाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायद्याच्या कलम १३ अंतर्गत गेल्या १७ आॅगस्टला नोंदविण्यात आलेल्या प्रकरणात आसियाला अटक झाली असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. अंदराबीला येथील एका महिला पोलीस ठाण्यात बंदिस्त करण्यात आले आहे.आसिया अंदराबीने १४ आॅगस्टला आपल्या निवासस्थानी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता. एवढेच नाहीतर, पाकिस्तानचे राष्ट्रगीत गात शहराच्या बाहेरील भागात या देशाचा झेंडा फडकविला होता. यानंतर काही वेळाने तिने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या नेतृत्वातील जमात-उद-दावाद्वारे पाकिस्तानमध्ये आयोजित सभेत दूरध्वनीवरून भाषण ठोकले होते. त्या वेळी सईद व्यासपीठावर उपस्थित होता.अंदराबीने यापूर्वीसुद्धा २३ मार्चला पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करताना या देशाचा झेंडा फडकविला होता. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
आसिया अंदराबीस अटक
By admin | Updated: September 19, 2015 22:37 IST