पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१३मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदासाठीच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत कोल्हापूर येथील अर्शद उस्मान मकानदार हा राज्यात प्रथम आला आहे. तर महिलांमध्ये औरंगाबाद येथील नीता केरबाजी कदम हिने पहिला क्रमांक पटकावला.पोलीस उपनिरीक्षकांच्या ७१४ पदांसाठी आयोगाने ८ डिसेंबर २०१३ रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. अनुसुचित जाती प्रवर्गातून चंद्रकांत कदम हा २२६ गुणांसह प्रथम आला आहे. तर इतर मागासवर्ग प्रवर्गातून गणेश रायकर याने पहिला क्रमांक पटकावला. उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी ज्यांना करायची आहे, त्यांनी उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आॅनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूरचा अर्शद मकानदार पीएसआय परीक्षेत पहिला
By admin | Updated: March 14, 2015 05:34 IST