मुंबई : दहिसर येथील भावदेवी मैदानात तिरंदाजीचा सराव सुरू असताना क्रिकेट खेळणाऱ्या युवकाच्या डोक्यातून बाण आरपार गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. ब्रिजेश सहानी (१५) असे जखमी युवकाचे नाव आहे.दहिसरच्या भावदेवी मैदानात नेहमीप्रमाणे एका बाजूला क्रिकेटचा सराव सुरू होता, तर दुसरीकडे तिरंदाजीचा. तिरंदाजी सराव शिबिरात हरिश गायकवाड याने सोडलेला बाण ब्रिजेशला लागला. हा बाण ब्रिजेशच्या डोक्यात आरपार घुसला. ब्रिजेश क्रिकेट खेळत होता. खेळादरम्यान बॉल घेण्यासाठी ब्रिजेश तेथे आला होता आणि हा अपघात घडला. गंभीररीत्या जखमी झालेल्या ब्रिजेशवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाखल झाल्याझाल्याच शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यात घुसलेला बाण काढण्यात आला. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.ब्रिजेश दहिसर येथील आयसी कॉलनीत राहतो. त्याचे वडील रिक्षाचालक असून, त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो उत्तम फलंदाज असून, त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले आहे. शुक्रवारी नेमका तो गोलंदाजी करीत होता आणि हा अपघात घडला. ब्रिजेशची उच्चस्तरीय क्रिकेटकरिता निवड झाली होती. या प्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, अशी माहिती उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तिरंदाजी सरावात डोक्यात घुसला बाण
By admin | Updated: January 17, 2015 05:57 IST