सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार्या चार जणांच्या टोळक्याला किनगावराजा पोलिसांनी नागपूर-मुबंई मार्गावरील दूसरबीड जवळ सोमवारी अटक केली. या टोळीमध्ये बुलडाण्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्या शे. शफी शे. कादरी या कुख्यात आरोपीचा सामावेश आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जालना तसेच बुलडाणा येथील पोलीस अधीक्षकांचे पथक तसेच स्थानिक पोलिसांनी नाकेबंदी केली. याचा सुगावा लागताच संशयित दरोडेखोरांनी त्यांचे वाहन सुसाट वेगाने मेहकरकडे दामटले. मात्र पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून दुसरबीडजवळील शंकर माळा परिसरात वाहनातील शे. शफी शे. कादरी (३0) (साखरखेर्डा), शे. जब्बार शे. जईनउद्दीन(शेंदुर्जन), सय्यद सोहिल सय्यद नजीर (१९)(सिल्लोड) व महेश जगण गारी (२0) या चौघांना ताब्यात घेतले. या आरोपींची झडती घेतली असता, आरोपींच्या वाहनातून एक तलवार, मिरची पावडर, लोखंडी रॉड इत्यादी साहित्य आढळून आले. पीएसआय उमेश भोसले यांनी किनगावराजा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चारही आरोपींवर भादवी ३९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शे. शफी शे. कादरी पोलीस दप्तरी मोस्ट वॉन्टेड म्हणून त्याची नोंद असून जालना, मंठा, सिल्लोड, अजिंठा, परभणी, जळगाव खान्देश, औरंगाबाद, बुलडाणा, साखरखेर्डा, सिं. राजासह गुजरातमध्येही त्यांच्या विरोधात दरोडा, पैशांच्या पाऊस पाडणे, नकली सोने, विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गत सहा महिन्यांपासून पोलीस शे. शफी याच्या मागावर होते.
कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीला अटक
By admin | Updated: June 28, 2016 02:03 IST