हरीश गुप्ता, नवी दिल्लीभाजपा नेतृत्वाने शिवसेनेशी जुळवून घेत या सर्वांत जुन्या मित्रपक्षासोबत पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शिवसेना असो वा पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, भाजपाने आपल्या सर्व मित्रपक्षांना एकत्र ठेवून रालोआला बळकट बनविण्याचे ठरविले आहे.शिवसेनेला विनाविलंब महाराष्ट्र सरकारमध्ये सामील करून घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि वित्त व सूचना आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली या भाजपाच्या ‘त्रिमूर्ती’ने घेतला आहे. याशिवाय केंद्रातील रालोआ सरकारमध्ये शिवसेनेला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सत्तावाटपाच्या या नव्या फॉर्म्युल्यावर आणि सरकारच्या किमान समान कार्यक्रमावर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे. या नव्या व्यवस्थेचाच भाग म्हणून शिवसेनेनेही नरमाई दाखवीत राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून तडकाफडकी हटविले आहे.महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांसोबत या नव्या व्यवस्थेवर चर्चा करण्यास खासकरून कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांना मुंबईला पाठविण्यात आले. तसेच मागील १० दिवस पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यावर असतानाच्या काळात अमित शहा आणि अरुण जेटली हे शिवसेना नेत्यांसोबत सतत फोनवर बोलत होते. या दोन्ही नेत्यांची गुरुवारी दिल्लीत मोदींसोबत चर्चा झाली. चर्चेत नव्या योजनेच्या अंमलबजावणीला अंतिम रूप देण्यात आले.
सेना सत्तेच्या उंबरठ्यावर
By admin | Updated: November 22, 2014 03:38 IST