मुंबई : शिवसेना सत्तेकरिता लाचार नाही. वेळप्रसंगी विरोधी पक्षात बसण्याची आपली तयारी आहे, असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतचा आपला निर्णय घोषित होण्याकरिता आणखी दोन दिवसांचा कालावधी असल्याचे जाहीर केले. मात्र त्याचवेळी ‘भगवा दहशतवाद’ असे संबोधित भाजपाला हिणवणाऱ्या शरद पवार यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा कसे याचे उत्तर आपल्याला भाजपाकडून अपेक्षित असल्याचे सांगत त्या पक्षापुढे नैतिक पेच उभा केला आहे.शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडण्याकरिता रविवारी आमदारांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेकडून मतदारांच्या असलेल्या अपेक्षा सत्ता असो अथवा नसो आम्ही पूर्ण करणार आहोत. कोण विरोधी पक्षनेता होणार किंवा विधानसभा अध्यक्ष होणार यापेक्षा हिंदू संपवण्याची भाषा करणाऱ्या देशविघातक शक्ती वाढत आहेत. हिंदुत्ववादी शक्तींचे विभाजन होऊ नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. मात्र ज्या शरद पवार यांनी प्रथम ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाचा वापर केला, इशरत जहाँला निरपराध ठरवले त्या राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपा घेणार असेल तर शिवसेनेला सरकारमध्ये जाणे अवघड होईल. वाजपेयी यांचे १३ दिवसांचे सरकार पवारांनीच पाडले होते. त्यामुळे भाजपा पवार यांचा पाठिंबा घेणार का, याचे उत्तर आपल्याला हवे आहे, असे ते म्हणाले. केंद्रात शपथविधीपूर्वी महाराष्ट्रात सत्तेचे वाटप कसे असेल त्याचे उत्तर हवे होते. अन्यथा केंद्रात मंत्रिपद देताना झाले त्याचीच पुनरावृत्ती झाली असती, असे सूचक विधान उद्धव यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)
सेनेचे तळ्यात-मळ्यातच
By admin | Updated: November 10, 2014 04:42 IST