ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 16 - धुळे - जळगाव रस्त्यावर फागणे गाववजवळील कोयल फिलिंग स्टेशन पेट्रोल पंपावर पहाटे पावणे तीन वाजताच्या दरम्यान अज्ञातांनी दरोडा टाकला. तीन अज्ञात इसम सुरत, नागपूर महामार्गावर पायी चालत आले. त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपासमोरील ध्वज फाडून तोंडाला बांधून पंपाच्या केबिन शिरकाव केला. काठी आणि धारदार शस्त्राने पंपावरील एका कर्मचा-यावर त्यांनी काठीने वार केला आणि त्याला जखमी केले. गल्ल्यातील रोख 15 हजार लुटून सीसीटीव्ही कॅमेरे तोडून अन्य दोन कर्मचा-यांना मारहाण करून दहशत निर्माण करत तेथून त्यांनी पोबारा केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात केबिनमधील एका कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेला कर्मचारी निफाड येथील रहिवासी आहे. तर पंपावरील अन्य तीन कर्मचारी जखमी असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस फौजफाटा तैनात झाला असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
By admin | Updated: July 16, 2017 09:05 IST