कोयनानगर : कोयना प्रकल्पाचा पाचवा व सहावा टप्पा यांच्या मंजुरीसाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न होण्यासाठी कोयना विभागातील जनतेच्या वतीने जलसंपदामंत्री यांना निवेदन सादर केल्याची माहिती भाजपाचे पाटण तालुका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, कोयना प्रकल्प पाचवा टप्पा (हुंबरळी उदंचन योजना) व कोयना प्रकल्प सहावा टप्पा यामधून १४०० मेगावॅट जलविद्युत निर्मिती होणार आहे. जलविद्युत निर्मिती ही इतर विद्युत प्रकल्पांच्या तुलनेत कमी दराने उपलब्ध होऊ शकते आणि कोयना प्रकल्पाचे अभियंते हे जलविद्युत निर्मितीमधील तज्ज्ञ अभियंते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या प्रकल्पाना तातडीने मान्यता मिळणे गरजेचे आहे.कोयना प्रकल्पाचा पाचवा टप्पा हा हुंबरळी गावाजवळ असलेल्या ओझर्डे धबधब्यावर उभारण्यात येणार असून, या ठिकाणी ४०० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. ओझर्डे धबधब्याच्या ३२५ मीटर उंचीचा फायदा घेत उदंचन प्रकल्प कार्यान्वित करणे व त्याद्वारे भूगर्भामध्ये वीजगृह उभारण्यात येणार आहे. ओझर्डे धबधब्याच्या वरच्या बाजूस धरणाची उभारणी करून धबधब्याच्या पायथ्याजवळ भूगर्भामध्ये वीजगृह उभारण्यात येणार आहे. वीजनिर्मितीनंतरचे पाणी कोयना धरणामध्ये सोडण्यात येणार आहे. सुमारे चार महिने ओझर्डे धबधब्याला मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने २४ तास वीजनिर्मिती होऊ शकते; परंतु उरलेल्या आठ महिन्यांमध्ये वीजनिर्मितीसाठी आवश्यक असणारे पाणी कोयना धरणातून उचलून धबधब्याच्या वरच्या धरणामध्ये सोडण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त पंपाची गरज नसून वीजगृहातील जनित्र पंप म्हणून काम करणार आहेत. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे विजेची मागणी नसणार आहे. त्यावेळी जनरेटर हे पंप म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे पाणी धरणातून उपसून धबधब्याच्या वरच्या बाजूस टाकण्यासाठी येणारा खर्च उत्पन्नाच्या तुलनेमध्ये फारच कमी असणार आहे. (वार्ताहर)पाचव्या टप्प्यासाठी २ हजार कोटी रुपये...कोयना प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याच्या प्रकल्पासाठी साधारणपणे २००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हुंबरळी उदंचन योजना उभारणी करता, न्युक्लियर पॉवर कार्पोरेशन आॅफ इंडिया आणि टीहरी जलविद्युत विकास महामंडळ यांना महाराष्ट्र शासनाने परवानगी पत्र दिले आहे. त्याकरिता मे न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन व जलसंपदा विभाग यांच्यामध्ये समन्वय राहण्यासाठी न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन यांच्या वतीने समन्यवय अधिकारी म्हणून त्यांच्या महामंडळातील अतिरिक्त मुख्य अभियंता अरुण समोटा यांची नियुक्ती २००८ मध्ये केली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.
पाचव्या, सहाव्या टप्प्यांसाठी मंजुरी आवश्यक
By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST