वाहनाचा अभाव : पथकातील वनरक्षक झाले कारकून नागपूर : नागपूर वन्यजीव विभागाने वाघासह इतर वन्यप्राण्यांची शिकाऱ्यांपासून सुरक्षा करण्यासाठी शिकार प्रतिबंधक पथक ‘अॅन्टी पोचिंग स्क्वॉड’ ची स्थापना केली आहे. मात्र नागपुरातील या पथकाची कामगिरी पाहता, ते केवळ नावापुरते शिल्लक राहिले आहे. या पथकाचे नाव ‘अॅन्टी पोचिंग स्क्वॉड’ असले तरी, या पथकाने गत अनेक वर्षांपासून एकही भरीव कामगिरी केलेली नाही. शिवाय एकाही शिकाऱ्याला पकडलेले नाही. पूर्वी वन परिक्षेत्र अधिकारी दर्जाचा अधिकारी या स्क्वॉडचा ‘प्रमुख’ होता. मात्र गत वर्षभरापूर्वी ते पद अपग्रेड करून, सहायक वनसंरक्षक अधिकाऱ्यांना या पथकाचे प्रमुख बनविण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या सोबतीला तीन वनरक्षक देण्यात आले आहेत. नागपूर वन्यजीव विभागातील या स्क्वॉडवर पेंच, टिपेश्वर, बोर, मानसिंगदेव व उमरेड-कऱ्हांडला या सर्व अभयारण्याच्या सुरक्षेची धुरा आहे. मात्र असे असताना गत वर्षभरापासून या स्क्वॉडकडे कोणतेही वाहन नाही. त्यामुळे सध्या हे ‘स्क्वॉड’ अक्षरश: पंगू झाले आहे. असे हे पंगू ‘स्क्वॉड ’ वाघांची सुरक्षा कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सुमारे वर्षभरापासून हे स्क्वॉड नागपूर कार्यालयातून बाहेर सुद्धा पडला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या स्क्वॉडने किती शिकाऱ्यांना पकडले आणि कितीविरुद्ध कारवाई केली, याचा विचार न केलेलाच बरा. वन्यजीव विभागाचे प्रमुख तथा मुख्य वनसंरक्षकांनी या पथकाला सक्रिय करण्याऐवजी यातील वनरक्षकांना बाबूगिरीच्या कामात गुंतवून या स्क्वॉडचे खच्चीकरण केले आहे. त्यामुळे स्क्वॉडच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)
‘अॅन्टी पोचिंग स्क्वॉड’ पंगू
By admin | Updated: September 7, 2014 00:56 IST