स्रेहा मोरे, मुंबई‘तुमच्या परिसरात कोणी भोंदू बाबा आहे का?’, ‘परिसरातील कोणती व्यक्ती भानामतीला बळी पडतेय का?’ तर मग आता याची थेट तक्रार तुम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडे करू शकता. जादूटोणाविरोधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘अंनिस’ने चोवीस तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करण्याचे ठरविले आहे. समाजाला विवेकी करण्याच्या व्यापक उद्देशाने सुरू झालेली ही चळवळ महाराष्ट्राच्या ३५ जिल्ह्यांमध्ये २२० शाखांमध्ये विस्तारलेली आहे. त्यात जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी झाल्यापासून राज्यभरातून जवळपास ९० हून अधिक तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे विविध मोहिमा आणि प्रचारयात्रेच्या माध्यमातून या कायद्याबद्दल जनजागृतीचे कार्य सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला ‘अंनिस’ने हेल्पलाईन सुरू करून महाराष्ट्रातील जनतेला अंधश्रद्धेविरोधात आवाज उठविण्याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळवून द्यायचे ठरविले आहे.गेले वर्षानुवर्ष समाजातील अंधश्रद्धेविरोधात अंनिस धडाडीने कार्य करीत आहे. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यापासून विविध माध्यमांतून अंनिसकडे तक्रारी येत आहेत. मात्र या तक्रारींसाठी योग्य व्यासपीठ नसल्याने या हेल्पलाईनद्वारे सामान्यांच्याच हाती विवेकाची धुरा असल्याचा मानस ‘अंनिस’कडून व्यक्त होत आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजात अधिक सजगता आणण्याचा प्रयत्न आहे. या हेल्पलाईनचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात शुभारंभ करण्यात येईल, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अंनिसची हेल्पलाइन
By admin | Updated: September 12, 2014 02:39 IST