सुरक्षा भिंतीला भगदाड : लगतच्या परिसरात गुरांचे गोठेनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सक्षम सुरक्षेचा दावा करीत असले तरीही अनेक त्रुटींमुळे हा दावा फोल ठरतो आहे. विमानतळालगतच्या गावातील पाळीव प्राणी आणि जंगलातील वन्यप्राणी विमानतळावर मुक्तपणे वावर करीत असल्याचे चित्र आहे. ६ नोव्हेंबरला सायंकाळी सुरत विमानतळावर प्रवासी विमानतळासमोर अचानक म्हैस आली. त्यामुळे बोर्इंग ७३७ विमानाचे इंजिन क्षतिग्रस्त झाले. विमान आकाशात भरारी घेण्याच्या तयारीत असतानाच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली. या गंभीर घटनेच्या चौकशीचे आदेश नागरी उड्ड्यण मंत्र्यांनी डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशनला (डीजीसीए) दिले आहे. याशिवाय एअरपोर्ट आॅथारिटी आॅफ इंडियाने (एएआय) अशा प्रकारच्या घटनेची शक्यता असलेल्या सर्व विमानतळाच्या संचालकांना तपासणीचे निर्देश दिले आहेत. नागपूर विमानतळ असुरक्षितनागपूर विमानतळावरसुद्धा वन्य प्राण्यांव्यतिरिक्त पाळीव प्राणी विमानाखाली आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विमानतळाच्या परिसरात प्राण्यांचा मुक्त वावर हे या घटनांचे मुख्य कारण आहे. सुरक्षा भिंतीलगतच्या गावांमध्ये गुरांचे गोठे आहेत. याशिवाय भगदाड पडलेल्या सुरक्षा भिंतीतून प्राणी सहजरीत्या धावपट्टीवर पोहोचतात. अनेक ठिकाणी भिंतीची उंची कमी आहे. गेल्यावर्षी सुरक्षा भिंत ओलांडून एक संदिग्ध व्यक्ती धावपट्टीपर्यंत पोहोचली होती. याशिवाय धावपट्टीवर साप, मोर, जंगली डुक्कर, हरीण, ससे आदी प्राणी आल्याची माहिती आहे. अनेक प्राणी मृतावस्थेत आढळून आले होते. वाढता धोका ओळखून सभोवताल सोलर फेन्सिंग लावण्यात आले आहे. तिसऱ्या भागीदाराकडून अपेक्षाहस्तांतरणानंतर मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) तिसऱ्या भागीदाराच्या शोधात आहे. सरकारी विमानतळाच्या खासगीकरणानंतर त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा भिंतीची उंची कमी आहे. जंगलाच्या काही भागात दारूच्या शिशा आढळून आल्याने रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वांचा वावर होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फ्लार्इंग क्लबजवळ म्हशीराज्यातील एकमेव सरकारी फ्लार्इंग क्लब नागपुरात आहे. त्यालगतच्या सुरक्षा भिंतीला कुलूप आहे. त्यासमोर मोठा खड्डासुद्धा तयार केला आहे. त्यानंतरही या गेटच्या बाजूकडील भिंत फोडून ये-जासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. दुसऱ्या सुरक्षा भिंतीतून म्हशी आत येतात. फ्लार्इंग क्लबच्या तुटलेल्या सुरक्षा भिंतीतून म्हशी सहजरीत्या छोट्या विमानांपर्यंत येऊ शकतात. अद्याप आदेश नाहीतसुरत विमानतळावर घडलेली घटना नागरी उड्ड्यण मंत्रालयाने गांभीर्याने घेतली. या धर्तीवर नागपूर विमानतळ प्रशासनाला एएआय किंवा डीजीसीए मुख्यालयाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत.
विमानतळाला प्राण्यांचा धोका
By admin | Updated: November 13, 2014 00:54 IST