पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन दोन वर्षे उलटली तरी मारेकऱ्यांचा छडा लागलेला नाही. मात्र या कालावधीत दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा जागर राज्यभर उभा राहिला आहे. कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असून, अंनिसच्या राज्यभरातील शाखांच्या संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० आॅगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. याचा तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच दाभोलकरांचे विवेकवादी विचार देशभर पोहोचविण्याचा चंग अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बांधला.राज्यात जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होणे, हा अंनिसच्या चळवळीला मिळालेले मोठे यश आहे. गेल्या दोन वर्षांत या कायद्यांतर्गत १०७ गुन्हे दाखल झाले आहेत. जातपंचायतीच्या चुकीच्या प्रथांना लगाम लावण्यातही चळवळीला मोठे यश मिळाले आहे. तरुण-तरुणी मोठ्या संख्येने अंनिसच्या कामामध्ये सहभागी होत आहेत, असे अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी सांगितले.अंनिसच्या कार्यकर्त्यांचे १७ गट तयार करून रिंगणनाट्ये बसविण्यात आली आहेत. या गटांनी वर्षभरात प्रयोग करून अंधश्रद्धेविरोधात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
अंनिसच्या विवेकवादी विचारांचा राज्यभर जागर
By admin | Updated: August 20, 2015 00:47 IST