ऑनलाइन लोकमत
राज, उद्धव ठाकरे यांचे जाळले ‘पोस्टर्स’
विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार
नागपूर, दि. 14 - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुंबईतील पत्रकारपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे बुधवारी नागपुरात पडसाद उमटले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विदर्भवाद्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘पोस्टर्स’ जाळले. विदर्भाच्या विरोधात ‘स्टंटबाजी’ करुन प्रसिद्धी मिळविण्याचा मनसे, शिवसेनेचा प्रयत्न आहे. परंतु आता विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असा निर्धार यावेळी विदर्भवाद्यांनी व्यक्त केला.
मुंबई पत्रकार संघातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कोअर कमिटी सदस्य अँड वामनराव चटप यांना धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजता नागपुरातील व्हेरायटी चौकात एकत्र आले. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे, राज व उद्धव ठाकरे यांचे ‘पोस्टर्स’ जाळण्यात आले. तसेच राज ठाकरे यांचा पुतळादेखील जाळण्यात आला.
प्रत्युत्तर देत मनसे कार्यकर्त्यांनीदेखील वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला