मुंबई : जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये कुपोषणमुक्तीकार्यक्रम राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये आता टाटा ट्रस्टही सहभागी होणार आहे. सीएसआर निधीतून त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत दोन्हींच्या अधिकाऱ्यांची बैठक सह्याद्री अतिथी गृहावर झाली. कुपोषणमुक्तीसाठी धुळे, हिंगोली, जालना, नागपूर, परभणी, सांगली, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना महिला आणि बालकांचे आरोग्य, पोषण, लसीकरण आदींविषयक माहिती, सूचना यांची देवाणघेवाण करणे सुलभ व्हावे यासाठी स्मार्ट फोन किंवा टॅब दिले जाणार आहेत. आयसीडीएस कॉमन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. जागतिक बँक आणि टाटा ट्रस्टच्या वतीने क्षमता बांधणी कार्यक्रमही राबविला जाईल. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन बालकांच्या पोषणासाठी करावयाच्या प्रभावी उपाययोजनांची माहिती दिली जाईल. बैठकीला राज्यमंत्री विद्या ठाकूर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन
By admin | Updated: May 19, 2016 06:01 IST