पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या(बोर्ड) दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान गैरप्रकार झालेल्या शाळांमधील संबंधित शिक्षकांवर शाळा प्रशासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. अशा कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या शाळांची संलग्नता आता राज्य मंडळाकडून काढून घेतली जाणार आहे.राज्यात परीक्षांदरम्यान गैरप्रकार घडलेल्या शाळांना नोटीस बजावण्याचे आदेश विभागीय मंडळांना दिले जाणार आहेत. परीक्षेदरम्यान चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शाळांनी सहा महिन्यांत कारवाई करणे आवश्यक आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर शाळा प्रशासनाने विभागीय चौकशी करायला हवी. त्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई झाली नाही, तर शिक्षण मंडळातर्फे संबंधित शाळेची संलग्नता काढून घेतली जाईल. मग त्या शाळेला राज्य मंडळाचे परीक्षा अर्ज भरता येणार नाहीत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. परंतु, शाळा प्रशासनाकडूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही म्हमाणे यांनी स्पष्ट केले.
... तर शाळांची संलग्नता काढून घेऊ
By admin | Updated: March 30, 2015 02:36 IST