लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : डॉ़ अशोक विखे अध्यक्ष असलेल्या डॉ़ विखे पाटील फाउंडेशनच्या लोणी येथील लिटल फ्लॉवर स्कूलचा रस्ता रविवारी गावातील दोघांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरल्याने शाळेचा रस्ता बंद झाला आहे. प्राचार्यांनी लोणी पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. विरोधी पक्षनेत्यांच्या गावात दंडेलशाही सुरू आहे, असा आरोप अशोक विखे यांनी केला आहे. शाळेत जाण्यासाठी शिवार रस्ता गेलेला आहे़ रस्ता अतिक्रमण होऊन वाहतुकीसाठी बंद झाला होता़ त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी अतिक्रमण काढून रस्ता पूर्ववत करण्यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता़ मंडल निरीक्षकांनी ३ जून रोजी जमीन मालकांसमक्ष हा रस्ता काढून दिलेला आहे़ त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण झाले.प्राचार्यांनी लोणी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी गुन्हा न नोंदविता महसूल विभागाकडे अथवा वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला दिला. अर्जाची पोहोच देखील दिली गेली नाही. अशोक विखे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. या दोघांमध्ये लोणी येथील विखे फाऊंडेशनच्या अध्यक्षपदावरुन वाद झाले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
लोणीत विखेंच्या शाळेचा रस्ता नांगरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 01:46 IST