कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस गतवर्षी नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून शालू अर्पण करण्यात आला होता. त्याचा अर्थात साडी प्रसादाचा लिलाव आज, शुक्रवारी गुढीपाडव्यादिवशी आयोजित केला होता. मात्र, अपेक्षित ४ लाख २० हजारांहून अधिकची बोली न आल्याने हा लिलाव दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आला. बालाजी देवस्थानने नवरात्रोत्सव २०१५ मध्ये हा शालू देवीस अर्पण केला होता. पहिल्या लिलावात अपेक्षित किंमत न आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हा लिलाव रद्द केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता अंबाबाई देवी मंदिरातील देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात लिलाव घेण्यात आला. यावेळी देवस्थानचे सहसचिव शिवाजी साळवी यांनी ४ लाख २० हजार ही सरकारी बोलीची रक्कम असून या किमतीच्या वर बोली लावण्यास सांगितले. मात्र, लिलावात सहभागी झालेल्यांनी काही प्रतिसाद न दिल्याने साळवी यांनी इच्छुकांना आपली बोली बोलण्यास सांगितले. त्यानुसार इचलकरंजीचे राम आडके यांनी २५ हजार रुपये इतकी सुरुवातीची बोली बोलली. त्यानंतर प्रदीपसिंह देसाई यांनी ३० हजार, सुभाष आमशे यांनी ५१ हजारची बोली लावली. काही काळ कोणीच बोली न लावल्याने पुन्हा समितीकडून बोली लावण्याचे आवाहन केले गेले. त्यानंतर राजेंद्र बुढ्ढे यांनी ५५ हजारांची बोली लावली. पुन्हा त्यानंतर प्रदीपसिंह यांनी ६५ हजार, तर आमशे यांनी ७० हजार आणि शेवटची बोली बुढ्ढे यांनी ७२ हजार इतकी लावली. शेवटच्या बोलीनंतर प्रक्रियाच थांबविण्यात आली. (प्रतिनिधी) >यापूर्वीच्या लिलावात ५ लाख ३२ हजार इतकी किंमत अपेक्षित होती. त्यावेळी अपेक्षित किंमत न आल्याने हा लिलाव रद्द करण्यात आला. पाच वर्षांच्या शालू लिलावाच्या सरासरीवर आजच्या लिलावाची किंमत ४ लाख २० इतकी ठरविण्यात आली होती. तरीही याहीवेळी अपेक्षित किंमत न आल्याने आम्ही हा लिलाव तहकूब केला. यानंतरची लिलाव प्रक्रिया समिती बैठकीत ठरवून घेऊ. - शुभांगी साठे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर > लिलावाची रक्कम ४ लाख २० हजार असतानाही सहसचिवांनी वाटते तितक्या रकमेची बोली बोलण्यास का सांगितले. आम्ही २५ हजार ते ७२ हजारापर्यंत बोली बोलली. अनेक भाविक देवीच्या श्रद्धेपोटी या लिलावात सहभागी होतात. देवस्थान समितीने ताळमेळ नसलेली भूमिका घेऊ नये. - प्रदीपसिंह देसाई, कोल्हापूर > देवस्थान समिती जर देवीच्या साडी प्रसादाची किंमत अव्वाच्या सव्वा लावणार असेल तर सर्वसामान्यांना देवीच्या प्रसादापासून दूरच राहावे लागेल. कारण इतकी किंमत सर्वसामान्य माणूस देऊ शकत नाही.- राम उषाण्णा आडके, इचलकरंजी
अंबाबाई शालूचा लिलाव दुसऱ्यांदा तहकूब
By admin | Updated: April 9, 2016 03:20 IST