शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 19:07 IST

साधारणत: पंधरा-सतरा वर्षांपूर्वीची गोष्ट. हेमलकसाच्या किर्र जंगलात वीज नसलेल्या एका अंधाऱ्या रात्री एक भलती चर्चा चालू होती

अपर्णा वेलणकर 
मुंबई, दि. 6 - साधारणत: पंधरा-सतरा वर्षांपूर्वीची गोष्ट. हेमलकसाच्या किर्र जंगलात वीज नसलेल्या एका अंधाऱ्या रात्री एक भलती चर्चा चालू होती. डॉ. प्रकाश आमटे यांच्यासमोर आपला लुकलुकता लॅपटॉप उघडून बसलेली, ‘परदेशस्थ भारतीय’देणगीदार संस्थेची अध्यक्ष असलेली व्यक्ती विचारत होती, ‘बोल प्रकाश, कसे लिहायचे प्रपोजल? तुझ्या कामाला एकूण किती रकमेची, कशाकशाची गरज आहे?’
डॉ. आमटे अवघडून सांगत होते, ‘काही नको काका, आहे हे पुष्कळ आहे की!’
‘पण मग तुझे काम कसे पुढे जाणार? पैसे कुठून येणार?’
- या असल्या आग्रहाची सवय नसलेले डॉ. आमटे सांगत राहीले, होईल काहीतरी व्यवस्था. कामाची गरज असेल, तोवर चालेलच ते. गरज संपली की थांबेल. त्यात काय?
- पण सामाजिक काम कितीही निरपेक्ष असले, तरी याही कामाला शिस्त हवी, नियोजन हवे, पैसा हवा कारण हे काम जिवंत राहायला हवे, पैसा उभा करायचा तर त्यासाठी प्रयत्न हवेत आणि या प्रयत्नांना दिशा हवी; हे त्या व्यक्तीने हर प्रयत्ने डॉ. आमटे यांच्या गळी उतरवले.. एवढेच नव्हे; तर लोकबिरादरीचे काम अखंद चालू राहावे म्हणून भक्कम आर्थिक बैठक कशी तयार करता येईल हे तपासून पाहीले, अपेक्षित आराखडे आखले, आवश्यक निधीची गणिते जुळवली, त्यासाठी स्वत:च एक ‘प्रपोजल’ लिहीले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या प्रपोजलची प्रत डॉ. आमटे यांच्यासमोर ठेऊन सांगीतले, ‘आता कर सही!’
- परदेशी देणगीदारांना गळाला लावण्यासाठी ‘रेडीमेड प्रपोजल्स’चे कारखाने चालवण्याच्या आजच्या (आणि ‘त्या’ही) काळात अशक्य वाटावा असा हा प्रसंग! डॉ. आमटे यांना परदेशी देणगी स्वीकारण्यासाठी राजी करणारे ते गृहस्थ म्हणजे डॉ. जगन्नाथ वाणी!
- ‘घेण्या’ची कणभर आसक्ती नसलेल्यांना शोधत शोधत महाराष्ट्रभर भटकत फिरणारा, ‘देण्या’ची विलक्षण तळमळ असलेला माणूस!
हेमलकसाच्या जंगलाबाहेरचे जग न पाहीलेल्या प्रकाश आमटे यांना थेट न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनच्या झळकत्या व्यासपीठावर जायला डॉ. वाणी यांनी राजी केले ते 2003 च्या बृहन्महाराष्ट्र अधिवेशनासाठी!
‘अमेरिकेत प्रकाश अर्धी चड्डी आणि बंडी ऐवजी किमान कुर्तातरी घालेल का आणि मुख्य म्हणजे बोलेल का?’- या अवघड प्रश्नाच्या उत्तरांच्या शक्यता शोधण्याची जबाबदारी डॉ. वाणींनी माझ्यावर टाकली, तेव्हापासून मी त्यांच्या मोठ्या टीमचा भाग बनून गेले... असे माझ्यासारखे कितीतरी छोटेछोटे दुवे जोडत डॉ. वाणींनी महाराष्ट्रातल्या सामाजिक कामांना बळ पुरवणारी एक जागतिक साखळीच तयार केली होती.
- ज्याला जे येते, ते त्याने करायचे असे साधे सूत्र घेऊन वर्षातून किमान दोनतीनदा तरी डॉ. वाणी कॅनडाहून भारतात येत, आणि एक मोटार घेऊन महाराष्ट्रात भिंगरी लागल्यासारखे भिरीभिरी फिरत. हरेक दौऱ्यात त्यांना पाच-पन्नास नवी माणसे मिळतच. समाजात काही बदल घडावा याची आंतरिक तळमळ असलेली ही माणसे. त्यांना एकमेकांशी जोडून दिले, की हे चालले परत कॅनडाला! मग यांनी त्यांचे हिशेब ठेवायला मदत करायची, त्यांनी ह्यांचे एफ.सी.आर्.ए.चे काम व्हावे म्हणून दिल्लीत हेलपाटे मारायचे, याने नसीमा साठी स्क्रीप्ट लिहायचे आणि त्याने नीलिमाचे प्रश्न सोडवायचे अशा जोड्या जुळत. जाताना डॉ. वाणींच्या पुराण्या लॅपटॉपमध्ये नव्या संस्था, त्यांचे काम, त्यांना कशी/किती मदत देता येईल त्याचे आराखडे अशी सगळी जंत्री भरलेली असे! तिकडे गेले, की मग ‘इकडच्यां’ना फोन सुरू!!अगदी शिस्तीच्या माणसालाही हरवील असा नेमकेपणा आणि ‘समाजसेवक’ म्हणवणाऱ्यांना लाजवील अशी वेडी तळमळ. महाराष्ट्रातले प्रत्येक चांगले काम आपल्याला कळलेच पाहीजे, आपण प्रत्यक्ष जाऊन ते पाहीलेच पाहीजे आणि काम खरेच बावनकशी असेल तर वाट्टेल ते झाले तरी त्याला आर्थिक मदत मिळालीच पाहीजे; एवढ्या त्रिसूत्रीवर डॉ. वाणींनी आपले निवृत्तीनंतरचे जीवन अक्षरश: उधळून दिले.
हे काम वेडे होते. वेडेच होते...पण ते करण्यामागे एका जातीवंत गणितज्ञाचा नेमकेपणा आणि अकटोविकटीची शिस्त असे. उत्तर अमेरिकेतल्या मराठी माणसांच्या खिशात हात घालून देणग्या मिळवणे हे मुळात कठीण! पण डॉ. वाणी ते सहज करीत. त्यानंतर मिळालेल्या देणगीच्या रकमेत कॅनडा सरकारकडून ‘मॅचिंग ग्रॅण्ट्स’ मिळवणे हे त्याहून कठीण. त्यासाठी प्रदीर्घ प्रस्ताव-लेखन, त्याचा पाठपुरावा, नंतर कॅनडाचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष करीत ते आॅडिट अशी मोठी सर्कस चालवावी लागे... त्यात डॉ. वाणींचा हातखंडा होता. या मार्गाने उत्तर अमेरिकेतल्या मराठी माणसांनी दिलेला एक डॉलर महाराष्ट्रात पोचेपर्यंत त्याचे सहा ते सात डॉलर्स होत. अशा देशा-परदेशातल्या देणगी-व्यवहारांमध्ये आलेल्या पैशाला जाताना ‘गळती’ लागते हे झाले एरवीचे. डॉ. वाणींचा व्यवहार उफराटा होता. ते जगभरातून मिळवत त्या देणग्या किमान सहा ते सात पटीने वाढून मगच महाराष्ट्रात येत. 
- महाराष्ट्र सेवा समितीच्या माध्यमातून हे सारे त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत- म्हणजे किमान तिसेक वर्षे निष्ठेने केले. त्यातून माणसे उभी राहिली. संस्था उभ्या झाल्या. कानाकोपऱ्यात चालणाऱ्या कामांना हक्काचे छप्पर मिळाले. डॉ. प्रकाश आमटे, नीलिमा मिश्रा यांच्यासारखी एकेकटी काम करणारी वेडी माणसे जगासमोर आली. ‘देवराई’, ‘एक कप च्या’, ‘प्रकाशवाटा’सारख्या कलाकृती घडल्या.
... आणि मुख्य म्हणजे आपल्या जन्मभूमीचे ॠण फेडण्याची प्रत्यक्ष अनुभवातून सिध्द होत गेलेली एक ‘रीत’ घडली.
हे सारे घडवणारा हा माणूस 1967 पासून म्हणजे वयाची तब्बल पन्नास वर्षे कॅनडात राहीला, तरीही त्याच्या मना-विचारावर पश्चिमेची कोरडी, व्यवहारी, स्मार्ट घडी चढली नाही. डॉ. वाणींचा स्वभाव अत्यंत मधाळ आणि त्यांचे हसणे अतीव प्रसन्न होते... साने गुरुजींच्या लाडक्या मुलांसारखे! कधीकधी ते पाहात ती ‘स्वप्ने’ भाबडी असत, त्यांना भेटणारी काही माणसे ‘दिसत’ तशी ‘नसत’, क्लेश होत, प्रयत्नांवर अनपेक्षीत पाणी पडे; असे झाले की ते म्हणत, ‘‘जाऊ दे, आपण आपले काम करावे!’’
डॉ. वाणींच्या स्वभावात रुजून असलेले हे ‘मूल’ मोठे हट्टी पण लोभस होते.
- लहानपणी मिळालेले राष्ट्रसेवादलाचे संस्कार या माणसाला आयुष्यभर पुरून उरले. या संस्कारांमध्ये स्वत:च्या व्यक्तिगत दु:खाचे एवढेही मळभ सार्वजनिक कामावर येऊ न देण्याची युक्ती होती, ढासळत्या समाजवास्तवाच्या धक्क्यांनी तसूभरही न ढळणारा चिवट आशावाद होता आणि आपुल्या जातीचा जो जो कुणी भेटेल त्याला आपल्या माळेत ओवत नेणारे एक निर्भर हसरे वेड होते!!!
- ते वेड आता संपले...