अन् आयुष्याला लाभला मातीचा गंध सेवाग्राम (जि.वर्धा) : श्रमदान, फावडे कशाला म्हणतात, मातीशी जुळलेले जीवन म्हणजे काय, याची फुसटशी कल्पना होती. हे जाणून घेण्याची जिज्ञासा कायम होती. बापंूच्या वास्तव्याने पुनीत सेवाग्राम आश्रमात त्यांचे विचार आणि आचार कळले. येथे आल्यानंतर लक्झरी आयुष्याला खऱ्या अर्थाने मातीचा गंध लाभला. हा विचार आणि आचारांचा ठेवा आयुष्याला नवी दिशा देणारा आहे, ही भावनिक आणि तेवढीच वैचारिक प्रतिक्रिया आहे, ऐतिहासिक शहर म्हणून प्रख्यात मध्यप्रदेशातील ग्लॉलियरच्या सिंधिया स्कूलच्या विद्यार्थ्यांची!२७ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सिंधिया स्कूलच्या श्रमसंस्कार शिबिराचा सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात गुरुवारी समारोप झाला. पुस्तकात आयुष्यातील चढ-उतार ऐकले आहेत. ते प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी माजी विद्यार्थी व नागपूरचे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शर्मा यांनी सेवाग्राम आश्रमात संस्कार शिबिर घेण्याबाबत सुचविले. शाळा व्यवस्थापनाने क्षणात ही सूचना मान्य केली.शिबिरात दहावीतील ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. येथे सर्व सोई-सुविधा मिळतील, असा सर्वसाधारण अंदाज या विद्यार्थ्यांचा होता. येथे आल्यानंतर आश्रमातील नियमाप्रमाणेच भोजन दिले जाईल, हे ऐकताच साऱ्यांचे चेहरे हिरमुसले. पण नाईलाज होता. येथील सात्विक भोजनाचा आस्वाद घेताच विद्यार्थ्यांचे चेहरे प्रफुल्लीत झाले आणि येथूनच या विद्यार्थ्यांचा प्रवास बापंूच्या विचारांनी सुरू झाला.चार दिवसांच्या कालावधीत या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच फावडे हातात घेऊन यात्री निवास परिसरात श्रमदान केले. मग, तळहातावर आलेल्या फोडाचीही तमा बाळगली नाही. त्या परिसराला नवे सौंदर्य बहाल केले. एका इमारतीच्या बांधकामातही स्वयंस्फूर्तीने हातभार लावला. दूरवर असलेली रेती दुसऱ्या माळ्यावर पोहोचविण्याची किमया या मुलांनी लिलया साधली. कुठे अस्वच्छता दिसली की, हे विद्यार्थी ते ठिकाण स्वत:हून स्वच्छ करू लागले. गोशाळेत जाऊन अनेकांनी गाईचे शेण उचलून खताच्या खड्ड्यात टाकले. आश्रम, शेती, गोशाळा आणि यात्री निवास परिसरात श्रमदान करून मातीशी असलेले नाते, श्रमाचे मूल्य, श्रमातून मिळणारा आनंद याचा प्रत्यक्ष अनुभवच घेतला. घरी आणि शाळेत अत्याधुनिक जीवन शैलीत जगत आलो आहोत. सामान्य जीवनाचे धडे बापंूच्या या आश्रमात प्रत्यक्ष घेता आले याचा आनंद परतताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.शिबिर प्रमुख रमेश शर्मा म्हणाले, सिंधिया स्कूलमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्र्थी शिक्षण घेताहेत. सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश त्यात आहे. बहुतांश विद्यार्थी उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. लक्झरी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले आहे. ते शिबिर पूर्ण करतील, याबाबत साशंकता होती. मात्र ते आश्रमात काही क्षणातच रूळले. बापूंचे जीवन व कार्य त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले, बापंूच्या कर्मभूमीत त्यांनी घालवलेले हे दिवस त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आहे. पवनार आश्रम, दत्तपूर आदी ठिकाणाचे महत्त्वही या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटीतून जाणून घेता आले. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)माजी विद्यार्थ्यांकडून कौतुकाची थापसिंधिया स्कूलच्या संस्कार शिबिराला शाळेचे माजी विद्यार्थी व नागपूरचे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शर्मा, प्रमोद मुनोत (नाहर), संदीप अग्रवाल, संजय अरोरा व प्रतिक मुनोत यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी चार दिवसांत श्रमदानातून केलेली कामे बघून त्यांनीही तोंडात बोटे घातली. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आजी आणि माजी विद्यार्थ्यांचा संवाद या निमित्ताने येथे घडून आला. ही मंडळी आपल्या क्षेत्रात मोठी आहेत. मात्र शाळेची ओढ कधीही कमी होत नाही, याचाच प्रत्यय त्यांनी व्यस्ततेतून वेळ काढून येथे भेट दिल्याने आला. त्यांनीही विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला. सुरेश शर्मा म्हणाले, आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात असलो तरी या ठिकाणी मात्र आम्हाला यांच्यात आम्ही दिसत आहोत. समानतेची शिकवण शाळेने आम्हाला दिली. समाजाचे दायित्व पण पाळण्याचे कर्तव्य शालेय संस्कारामुळे होत आहे. विद्यार्थी दशेत कशी धमाल करीत होतो याची आठवण ताजी झाली, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्यात.
सोबत नेला बापूंच्या विचार आणि आचारांचा ठेवा
By admin | Updated: October 31, 2014 00:45 IST