मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युतीचे जागावाटप निश्चित झाले असून औरंगाबाद महापालिकेत सेनेची सरशी होऊन सेना ६४ व भाजपा ४९ जागा लढविणार आहे. शिवसेना-भाजपाच्या नेत्यांच्या याबाबतच्या बैठका रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या.नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ६८ तर भाजपा ४३ जागा लढवणार आहे. नवी मुंबई महापालिकेत १११ जागा असून गतवेळी शिवसेनेने ७५ तर भाजपाने १४ जागा लढवल्या होत्या. म्हणजे यावेळी भाजपाला २९ जागा वाढवून देण्यात आल्या. औरंगाबाद महापालिकेतील एकूण जागा ११३ असून भाजपा ५३ व शिवसेना ६० असा जागावाटपाचा फॉर्म्युला असावा, असे भाजपाचे मत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पर्यावरणमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम आणि शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्यात रविवारी सकाळी बैठक झाली. त्यामध्ये जागावाटपाच्या तिढ्याबाबत चर्चा झाली. त्याचवेळी औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपा नेत्यांचीही बैठक सुरु होती. आपण औरंगाबादमध्ये जाऊन सायंकाळपर्यंत युतीचे जागावाटप जाहीर करू, असे दानवे यांनी मुंबईत जाहीर केले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. मागील २०१० मधील निवडणुकीत औरंगाबादमध्ये शिवसेनेने ५८ तर भाजपाने ३८ जागा लढवल्या होत्या. (विशेष प्रतिनिधी)
नवी मुंबईत युती जुळली; औरंगाबादेत सेनेची सरशी
By admin | Updated: April 6, 2015 04:20 IST