मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीमध्ये आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये किती संशयकल्लोळ आहे, त्याचे उघड दर्शन महाराष्ट्राला घडले.राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर तत्कालीन सभापती प्रा. ना. स. फरांदे यांना पदावरून दूर न करण्याचा निर्णय घेतला होता, याकडे लक्ष वेधत माणिकराव ठाकरे म्हणाले, की सभापतीपद मिळवण्याकरिता आमचा मित्रपक्ष कुठल्याही तडजोडीला तयार झाला असून, आता त्याची भूमिका विरोधी पक्षाची राहिलेली नाही. यापूर्वी निकालाअगोदर आमच्या मित्राने भाजपा सरकारला पाठिंबा देऊ केला होता. भविष्यात आमच्या मित्रपक्षाची रा.स्व. संघ व भाजपासोबत आघाडी होणार आहे, सांगताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत माणिकराव तुम्हीही एक दिवस कंटाळून संघात याल, अशी टिप्पणी केली. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणात भाजपावर येथेच्छ टीका केली. ते म्हणाले, ‘मूंह में राम, बगल में छुरी’ असे भाजपाचे धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साटेलोटे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला गेले व शरद पवार यांचा सल्ला घेऊन काम करतो, असे म्हणाले. एका मराठी माणसाचा सल्ला घेऊन काम सुरू असल्याचे ऐकून आनंद झाला, असा टोला कदम यांनी लगावला. त्यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी बाळासाहेब व पवार यांची गाढ मैत्री पाहून त्या वेळी आमचा मेंदू थंड झाला होता का, अशी कोपरखळी मारली. त्यालाही कदम यांनी उत्तर देत ‘पण त्या मैत्रीत कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसत नव्हता’, असा शेलका वार केला. आमचे मेंदू शाबूत असून, ज्यांच्या मेंदूत बिघाड झालाय त्यांनी तो दुरुस्त करावा, असेही ते बोलले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट उठले आणि कुणाचा मेंदू कुणी तपासायचा ते काळ ठरवेल, असा चिमटा कदम यांना काढला. कदम यांना शिवसेनेत काय चालले ते कळत नाही; त्यामुळे सभागृहात काय चालले आहे ते कसे कळणार, अशी पुस्तीही बापट यांनी जोडली. कदम यांनी आपला मोर्चा उपसभापती वसंत डावखरे यांच्याकडे वळवत उद्या तुमच्यावरही पद गमावण्याची वेळ येणार असल्याचा इशारा दिला. त्यावर ‘माझी इज्जत स्वत:वर अवलंबून असून खुर्चीवर नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतोे, ‘मी आपला मित्र आहे माझी इज्जत जाऊ देणार नाही’, असे डावखरे यांनी सुनावताच सभागृहात हशा पिकला.राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले, की आमचा पंढरपूरच्या विठ्ठलावर राग नाही तर त्यांच्या सभोवतीच्या बडव्यांवर आहे. या बडव्यांनी बदसल्ला दिल्याने आम्ही सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणला. सत्ता हेच आमचे उद्दिष्ट असते तर १९९९ साली केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सामील झालो असतो. एखाद्या ठरावावर कुणी समर्थन दिले म्हणजे त्या पक्षांचे जुळले, असे होत नाही. राधाकृष्णा विरोधी पक्षनेते पदासाठी तू कुठे कुठे गेला, कुणाकुणाला भेटला तेव्हा कुठे गेला तुझा सेक्युलर धर्म, असा सवालही तटकरे यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)आपल्यावर तीन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला हे खरे आहे. मात्र तिन्ही वेळा तो आपल्या अनुपस्थितीत चर्चेला न घेण्याचा निर्णय घेतला गेला. आताही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला आपण तयार आहोत. चौकशीत दोषी आढळलो तर सभागृह सांगेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, अशा शब्दांत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्यावरील टीकेला आव्हान दिले. वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणात रामाने बाण मारायची गरज नव्हती, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. आकड्याची सोंगटी फेकून सारीपाटावर अप्रतिष्ठेचे गणित जुळवण्याच्या या प्रकाराचा आपल्याला खेद वाटतो, असा हल्ला त्यांनी राष्ट्रवादीवर केला.
युती-आघाडीत संशयकल्लोळ!
By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST