मुंबई : एकीकडे महायुतीचे एकदाचे जमले असे चित्र असताना आघाडीतील बिघाडी मात्र मंगळवारीही कायम राहिली. आघाडीची पुन्हा सत्ता आल्यास अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि १४४ जागांची मागणी राष्ट्रवादीने केली असून, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव फेटाळत १२४ जागा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. त्यामुळे सकाळी झालेली जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली असून, यावर आता बुधवारपर्यंत अंतिम तोडगा काढला जाईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, बांधकाम मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. आघाडीमध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे सूत्र ठरले असताना राष्ट्रवादीने मंगळवारी अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला. आपण अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागत आहात म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून येणार नाहीत, अशी आपल्याला शंका वाटते का, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत केल्यानंतर राष्ट्रवादीने हा मुद्दा लावून धरला नाही, असे समजते. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून तिढा सुटणार नसेल तर दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी याबाबत चर्चा करावी, असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत लावला पण जागावाटपाची कोणतीही चर्चा आता दिल्लीत होणार नाही. श्रेष्ठींनी आम्हाला त्याबाबतचे सर्वाधिकार दिलेले आहेत, असे मुख्यमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मंगळवारच्या बैठकीत स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस १४४ जागांवर ठाम असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितले असल्याची माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांना दिली. (विशेष प्रतिनिधी)
आघाडीचा तिढा कायम
By admin | Updated: September 24, 2014 05:11 IST